2000 ची गोष्ट, सोसायटीमध्ये खेळायला म्हणून खाली चाललो होतो आणि जाताना मला आमच्या सोसायटीत राहणारे जोशी काकांनी थांबवलं… म्हणाले काय करतोयस ? मी म्हटलं काही नाही खेळायला चाललोय. तसे म्हणाले नाटकात काम करणार का ? मला पहिल्यांदाच कोणीतरी विचारलं होतं. छातीत धस्स झालं. पोटात गोळा आला. पायाखालची जमीन सरकली. हात थंडगार झाले. मी आणि नाटकात ? हा माणूस माझी चेष्टा तर करत नाही ना ? असा विचार मनात चमकून गेला. अविश्वास दाखवावा असं काही ते वय नव्हतं. मनात आलेल्या भीतीने शरीरावर जी पकड घेतली होती, तीच झटकून मी चटकन हो म्हणालो. हा एक होकार माझं आयुष्य पार बदलून टाकेल असं मला त्याक्षणी मुळीच वाटलं नव्हतं. पुढे जोशी काकांनी माझी एका आजोबांशी ओळख करून दिली. साधारण सत्तरीच्या आसपास असलेले हे आजोबा सानेगुरुजींची पुस्तक विकायचे. मला त्यांनी साने गुरुजींचे भारतीय संस्कृती नावाचे पुस्तक भेट दिलं. ‘दादा’- सगळे जण त्यांना दादा म्हणत. त्यांचं खरं नाव ‘दत्ता पुराणिक’. अंगावर पायजमा कुर्ता, डोक्यावर गांधी टोपी आणि काखेत एक शबनम ची पिशवी. त्या पिशवीमध्ये काही लिमलेटच्या गोळ्या आणि साने गुरुजींची पुस्तकं, हिशोब साठीची एक वही. कुठेतरी करत असलेली नोकरी संपल्यानंतर या माणसाने साने गुरुजीं चे विचार त्यांच्या पुस्तकांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत एवढाच एक ध्यास घेतला होता. त्यांनी पंचवीस हजारच्या वर प्रति विकल्या होत्या. अत्यंत साधे राहणीमान असलेला हा माणूस विनोबा भावे, गांधीजी आणि साने गुरुजी यांची तत्व शेवटपर्यंत उराशी बाळगून होता. नाटकाच्या तालमीला अनेक लोकांचा गोतावळा जमला होता. माझ्या वयाची बरीच मुलं, मुली होती. दादांनी माझ्याकडून नाटकातले काही परिच्छेद वाचून घेतले. पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग या मराठी माध्यमाच्या शाळेत मी शिकत असल्यामुळे मला मराठी वाचायला फार काही कष्ट पडले नाहीत. स्वच्छ वाणी, आईचं संस्कृत आणि बाबांचं मराठी वाचन खूप सुंदर असल्यामुळे परिणाम माझी थोरली बहीण आणि मी पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन मराठी साहित्य विश्वात फिरून आलो होतो. पहिली पायरी तर मी पार पाडली होती. पण आता त्यांनी मला गायला सांगितलं. गाण्याचं मी रीतसर प्रशिक्षण घेतलं नव्हतं, पण सात महिन्याचा असल्यापासून सवाई गंधर्वला न चुकता दर वर्षी जात होतो. घरामध्ये कायम हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले सुर रेंगाळत असत वडिलांना भीमसेन जोशी सवाई गंधर्व पंडित जसराज किशोरी अमोणकर आणि बिस्मिल्ला खान अमजद अली खान शिवकुमार शर्मा हरिप्रसाद चौरसिया यांच्या कॅसेट्स वारंवार वाजवण्याचा शौक अभंग भारुड किर्तन हे हे आजोळी सारखं सुरु असायचं त्यामुळे तिथे मी शिकलेल्या तोडक्या-मोडक्या तबल्याची साथ संगत आणि गजर आरत्या ओव्या जेव्हा संधी मिळतील तेव्हा म्हणण्याची भारी हौस त्यामुळे देवाचिया द्वारी ही ओवी सादर करून मी दुसरा टप्पा सुद्धा पार केला माझी निवड झाली नाटक कुठलं त्यातले संवाद कसे आहे मांडणी कशी आहे हे  समजण्याचं ते वय नव्हतं मिळालेल्या संधीचं सोनं करायचं एवढं ठाऊक होतं नाटकाचं नाव होतं संत ज्ञानेश्वर मधुकर जोशी ज्यांना सगळे आण्णा म्हणायचे त्यांनी हे नाटक लिहिलं होतं भरत नाट्य मंदिर मधल्या सगळ्या नाटकांमध्ये प्रकाश योजनेसाठी खूप प्रसिद्ध असलेले अण्णा उंचीने साधारण चार साडेचार फूट अंगात साधा शर्ट तो कायम खोचलेला खाली कॉटनची पॅन्ट आणि पायात बाटाच्या वाहणा असेच फिरायचे ज्ञानेश्वरांचे अभंग ओव्या तोंडपाठ ज्ञानेश्वरीतला कुठलीही दाखले सुद्धा अगदी सहज देऊ शकत.

निवृत्तीनाथांनी कशी दीक्षा घेतली? मुक्ताईचा स्वभाव कसा होता? या चारही भावंडांना वाळीत कसं टाकलं? तिथपासून ते ताटी उघडा ज्ञानेश्वरा, मग मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती मांडे भाजणे, रेड्या कडुन वेद म्हणुन घेणे, चांगदेवांना भेटण्यासाठी भिंत चालवणे असे एकाहून एक चमत्कारी प्रसंग रंगमंचावर घडवून दाखवले. तालमी सुरू झाल्या. हळूहळू नाटक आकार घेऊ लागलं आणि रंगमंचावर जेव्हा पहिलं पाऊल टाकण्याआधी खरंतर नाटकात काम करणार का? हा प्रश्न विचारल्या नंतर झालेली अवस्था खूपच किरकोळ वाटू लागली होती. घशात कोरड पडणे, अंगात थरथर सुटणे होती, आपण पाठ केलेले संवाद विसरून जाणे, अशी भीती रोजच्या सवयीची झाली होती. पण जसा रंगमंचावर प्रवेश केला, तशी समोर दिसली एक अखंड अंधारात असलेली पोकळी आणि त्यात बसलेल्या माणसांच्या अखंड सावल्या. या सगळ्या सावळ्या माझ्या दिशेने तोंड करून बसल्या होत्या. मी माझे संवाद म्हणायला सुरुवात केली, तश्या या सगळ्या सावल्या जणूकाही आणखी लक्ष देऊन ऐकण्यासाठी माझ्या दिशेने सरसावल्या. तालीम नीट झाल्यामुळे मी संवाद विसरत नव्हतो वाक्यागणिक माझा आत्मविश्वास वाढत चालला होता प्रत्येक प्रयोगा गणिक तो वाढतच गेला

आता वयोवृद्ध प्रेक्षक प्रयोग संपताक्षणी रंगमंचावर येऊन माझ्या पाया पडू लागले. माझ्यासाठी हे खूप नवीन होतं. मग मीही चतुराईने वारकरी संप्रदायानुसार सर्वांच्या पाया पडू लागलो. कोणी हार आणत असे, कोणी बक्षीस म्हणून काही रक्कम देत असे, तर कोणी काही भेटवस्तू देत असत. या पहिल्याच नाटकाने भरभरून दिलं. इयत्ता सहावी मध्ये ज्ञानेश्वरी वाचली होती, तेव्हा त्याचं आकलन नाही. तितकच झालं होतं. पण आता पुन्हा एकदा ज्ञानेश्वरी वाचली, या नाटकाच्या निमित्ताने ती समजून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्याच वयाचा एक मुलगा समाजाचा एवढा मोठा विरोध पत्करून, त्याच समाजासाठी सगळ्या हाल-अपेष्टा सहन करून एका मोठ्या ग्रंथाचा अनुवाद करतो. हे विचार या संपूर्ण प्रक्रियेपासून कायम मनात घर करून राहिले. या नाटकाने प्रतुल पवार, अमृत सामक सारखे जिवाभावाचे मित्र दिले.

माझाच लहानपणीचा काम करणारा विनू सावरकर, माझ्या बहिणीचं काम करणारी प्रचिती सुरू, धाकट्या भावाचा काम करणारा दादांचा नातू आणि इतर भूमिकांमध्ये सांगलीचा तबला वादक विजय कुलकर्णी, विवेक काटकर, चंद्रशेखर रणभोर इ. लोक होते. दादांना दिग्दर्शनासाठी मदत करायला प्रतिभा दाते आल्या होत्या. अगदी थोड्याच दिवसात ती आमची प्रतिभा मावशी झाली आणि तिची सख्खी धाकटी बहिण माझी मानलेली आई. प्रमोद आडकर आणि विलास आडकर यांची निर्मिती असलेल्या या नाटकाने प्रयोगांची पंचविशी ओलांडून 2001 ला प्रेक्षकांचा निरोप घेतला.